Uncategorized

‘पण तू ते धनुष्य उचललं कसं ? लोखंडाचे होते म्हणे ते !’ भरताच्या ह्या प्रश्नावर लक्ष्मणाने फक्त खांदे उडवले. त्याला हा प्रश्न पडला नसावा. राम काहीही करू शकतो हा विश्वास पराकोटीचा मुरला होता त्यात. रामा  ऐवजी सीता बोलती झाली ‘त्यात विशेष काही नसतं भरता, हातांची, मनगटाची विशिष्ट हालचाल करून फक्त एक बाजूने धनुष्याला झटका दिलास तर ते आपोआप त्याचा तोल सांभाळते. पण तू जर का ताकद लावायला जाशील तर ते ढिम्म हलणार नाही. रामाने हे  ओळखले. त्याला विश्वामित्राने  कल्पना दिली असणार. हो ना ?’ सीतेने उत्तरासाठी  रामाकडे पाहिले. ‘हो. बरोबर बोलतेयस तू. तुला लहानपणीच म्हणे ते तंत्र गवसले होते म्हणून तू खेळायचीस त्या धनुष्य शी.’ सीते, धनुष्य हाताळायचे तू शिकली असशील लहानपणी पण राम एवढा सोपा नाही बरं का ? शत्रुघ्नाच्या कधी न बोलणाऱ्या मुखातून अशी लकेर येताच हास्याचे फवारे उठले आणि सर्व भावंडे खिदळायला लागली. लांबून येणार खळाळते हास्य ऐकून मंथरा एक खिडकीतून डोकावली. तिच्या कपाळावर का कोण जाणे आट्ट्यांचे जाळे पसरले. काही तरी मनाशी ठरवून ती काठी टेकत सेनापतीच्या महाला कडे चालू लागली.